Popular Posts

Tuesday, December 11, 2012

सिलिकॉन व्ह्याल्लीत जा....पण सह्याद्रीला विसरू नको


खालील कविता मी प्रथम माझ्या नववीच्या वर्गात असताना वाचली होती.
त्यावेळी मराठी दैनिक 'सकाळ' सोबत 'युवा' नावाची एक पुरवणी येत असे.
आणि ती पुरवणी आम्हा मुलांमध्ये खूप लोकप्रिय असायची!
त्याच 'युवा' पुरवणी मध्ये मी एकदा वरील मथळ्याची एक भावनिक कविता वाचली.
ती मनाला इतकी भावली कि वाटले आपण कसे तरी त्या कवितेचा भाग आहे!
त्या कवितेचा कटाउट मी त्यानंतर ५ वर्षे सांभाळून ठेवली! पण ती कालांतराने हरवली!
काही वर्षामागे तीच कविता मला एका मित्राकडून इ-मेल  मधून मिळाली. त्यावेळी 'युवा' पुरवणी मध्ये खालील कवितेचा लेखक 'अनामिक' असे नमूद करण्यात आले होते. पण नंतर मला कळले कि हि सुंदर कविता मंदार श्रीराम काळे यांनी लिहिली आहे! त्यांना ह्या त्यांच्या कृतीसाठी अनेक आभार आणि शुभेछ्या.

हे कविता म्हणजे एका मित्राने (लेखकाने?) नोकरीसाठी परदेशी गेलेल्या आपल्या मित्राला माघारी येण्यासाठी घातलेली एक अतिशय भावनिक आणि ह्रिदयाला भिडणारी साद! आशा आहे तुम्हालाही आवडेल!


सिलिकॉन व्ह्याल्लीत जा....पण सह्याद्रीला विसरू नको

व्हिसा stamp झाल्यावरती एकाच धावपळ उडून गेली ।
भवितव्याच्या स्वप्नांनी रे तहान भूक हरवून गेली ।।
भेटी झाल्या, खरेदी झाली, ब्यागसुद्धा भरून झाली ।
सारख्या सूचना देता देता आईंची धांदल उडून गेली ।।
तासामागून तास गेला आणि फ्लाईटची वेळ जवळ आली ।
निरोप द्यायला विमान तळावर सवंगडयांनी गर्दी केली ।।
कौतुक आणि काळजी तुझ्या बाबांच्या चेहऱ्यावर दिसून गेली ।
पाठ तुझी फिरता, त्यांची पापणी सारं बोलून गेली ।।
अरे आपली माती, आपली मानसं, देश आपला विसरू नको ।।१।।

विमान उडालं तेंव्हा एक-एक डोळा पाण्यानं भरला असेल ।
अगदी अखेरच्या क्षणी मित्रा मनानं बंड केलं असेल ।।
नकोच जायला परदेशात एकदा तरी वाटलं  असेल ।
अरे अकांक्ष्यांच्या पंखानाही अश्रूंनी जखडून टाकलं असेल ।।
लिंकनचे शब्द आठव, अश्रू ढाळायला लाजू नको ।
गीतेतलाही उपदेश आठव हात-पाय गाळून बसू नको । 
अरे अटकेपार झेंडे लाव पण माय मराठी विसरू नको ।।२।। 

अरे अन्न दिलं, वस्त्र दिलं, सह्याद्रीनच ओसरी दिली ।
आई-बापानं कष्ट करून ज्ञानाची भरून शिदोरी दिली ।।
गुरुजनांनी संस्कार दिले, गावकऱ्यांनी यारी दिली ।
अरे टपरी वरच्या अप्पानही वेळोवेळी उधारी दिली ।।
देश सुटला पोटासाठी बंध इथले तोडू नको ।।३।।

पोटापाण्यासाठी मित्रा दाही दिश्याना जायला हवं ।
दिशा देण्या प्रवाहाला, प्रवाहापुढे पळायला हवं ।।
कासवासारखं विश्वासानं एकेक पाउल टाकायला हवं ।
एखादं स्वप्न देशासाठी आपणही पाहायला हवं ।
व्यावसाहीकतेच्या दुनयेत या भावनानाही जपायला हवं।।
नमस्कार सांग लीबर्टिला पण आई भवानी विसरू नको ।।४।।

स्वर्ग सुखं सगळी मित्रा हात जोडून उभी असतील ।
भुरळ पाडतील तुला आणि मग मर्यादेला हसत बसतील ।।
जीम असेल, क्लब असतील, मैदानंही भरत असतील ।
मंद मंद उजेडात कुठतरी पार्ट्या सुद्धा होत असतील ।।
रॉंक यांड रोलवर बेभान हो पण ताण लताची विसरू नको ।।५।।

पंखात शक्ती आल्यावरती पाखरं दूर उडून जातात ।
आई-वडिलांच्या घरट्यात मग आठवणींची भुतं राहतात ।।
अरे आठवणींची भुतं आईला रोज अश्रूंची भेट देतात ।
स्वप्नात भेटेल तुला तर तिची झोप सुद्धा पळवून नेतात ।।
आईच्या चरणी परत ये, स्वर्गात सुद्धा रमू नको ।।६।।

वाट पहात मित्र तुझा पानपट्टीवर थांबला असेल ।
मग तुझ्या वाटणीचा ग्लास कुठेतरी पार्टीत तसाच उरला असेल ।।
ब्याट घेऊन पिट्या एकटाच मैदानात उतरला असेल ।
तुझ्याविना संघ महादया, फायनल म्याच हरला असेल ।।
अरे भेटीसाठी तुझ्या इथला प्रत्तेकजन आतुरला असेल ।
आणि आठवणींनी गावच्या कधीतरी तुझाही उर भरून आला असेल ।।
भरारी मार उंच आकाशी, पण मातीचं नातं तोडू नको ।।७।।

वाटत असेल तुलाहि मित्रा सह्याद्रीत परत यावं ।
कामधंदे सोडून सगळे डोंगर दर्यात फिरत राहावं ।।
निशाचरासारखा गुपचूप रात्री रोज बाहेर पडावं ।
मग धाब्यावारती मित्रांबरोबर तासंतास बसून राहावं ।।
क्रिकेट खेळावं डोंगरावरती, दमून भागून घरी यावं ।
झंकारची भेल खावी अन कृष्णामाईचं पाणी प्यावं ।।
अरे क्वाफ़िनाचं पाणी पी पण कृष्णामाईला विसरू नको ।।८।।

परवाच पाहिलं मित्रा आपला सह्यात्रीच रडत बसला होता ।
त्याचा म्हणे हिरा कोणीतरी पश्चिमेला पळवून नेला होता ।।
भवितव्याची स्वप्ने दाखवून राणीच्या मुकुटात ठेवला होता ।
प्रकाशाला त्याच्या आता सह्याद्रीच पारखा झाला होता ।।
सह्याद्रीच्या बुरुजा असा आयत्यावेळी ढळू नको ।
बिझनेस वॉरच्या योद्ध्या असा मैदान सोडून पळू नको ।।
मग नुसताच आवंढा गिळू नको, नुसत्याच मुठी आवळू नको ।।९।।

सह्याद्रीच्या कुशीत मीत्रा मोठी रत्नं होऊन गेली ।
देशासाठी नरदुर्गांनी सर्वस्वाची होळी केली ।।
अरे आपल्यालाही ज्या सह्याद्रीनं विश्वास दिला, प्रेरणा दिली ।
त्याचीच मांडी आज कारे फुटक्या काचांनी भरून गेली ।।
असेल देश गरिब आपला, कचरा म्हणून हिणवू नको ।।१०।।

वडील रागावणार नाही हवंतर                 तू फक्त परत ये ।
आई सूचना करणार नाही                     तू फक्त परत ये ।
मित्र उधाऱ्या मागणार नाही                   तू फक्त परत ये ।
शेजारीही चुगळ्या करणार नाही              तू फक्त परत ये ।
म्याच अर्धी राहिली मित्रा                     तू फक्त परत ये ।
तुझीच ब्याटींग पहिली मित्रा                  तू फक्त परत ये ।


अरे अटलजींचे शब्द आठव                   तू फक्त परत ये ।
टाटा बिर्लांची जिद्द आठव                      तू फक्त परत ये ।
सावरकरांचा त्याग आठव                    तू फक्त परत ये  |
मग गावचा ओसाड भाग आठव              तू फक्त परत ये ।
गावचा गोवर्धन उचलू मित्रा                 तू फक्त परत ये ।
अरे अख्खा देश हलवू मित्रा                  तू फक्त परत ये ।

इच्छा श्रींची सोडू नको, शपथ शिवाची मोडू नको ।
हुतात्म्यांची स्वप्नं अशी डॉलर साठी विकू नको ।।
सह्याद्रीच्या सूर्य असा पश्चीमेला मावळू नको ।।११।।
सिलिकॉन व्ह्याल्लीत जा, पण सह्याद्रीला विसरू नको ।।


                                              - मंदार श्रीराम काळे 

2 comments:

  1. फक्त अन् फक्त काळजाला हात घालणारी अन् अजरामर अशी रचना. Timeless poem 🙏🏼

    ReplyDelete